‘दगडूशेठ’ गणपतीसमोर ३१ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

0

 

पुणे : एन पी न्यूज 24 – ओम् नमस्ते गणपतये… ओम गं गणपतये नम:… मोरया, मोरया… च्या जयघोषाने तब्बल ३१ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. पारंपरिक वेशात पहाटे ४ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली. गणेश नामाचा जयघोष करीत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. अथर्वशीषार्सोबत महाआरती आणि गणरायाचा गजर करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला.

निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे, परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, विश्व हिंदू परिषदेचे दादा वेदक, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, उत्सवप्रमुख व नगरसेवक हेमंत रासने, सुनील रासने, माणिक चव्हाण, शुभांगी भालेराव, युवा रोषणाईकार शुभांगी वायकर, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजेश सांकला यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर मन शांत करणारा ओंकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. महिला हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत गणरायाला नमन करीत होत्या. गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेह-यावरील उत्साह ओसंडून वहात होता. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणातील या उपक्रमाचे ३३ वे वर्ष होते. कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली.

डॉ.नीलम गो-हे म्हणाल्या, गणेश कृपेने सर्वांना आपल्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर यश मिळणार आहे. गणेशाची अशीच कृपा महाराष्ट्रावर राहू दे, त्यामुळे आपले राज्य सुजलाम् सुफलाम् होईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमधून गणरायाने आपले रक्षण करावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

शुभांगी भालेराव म्हणाल्या, तब्बल ३३ वर्षांपूर्वी महिलांचा सहभाग या गणेशोत्सवात असावा, याकरीता ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांच्या विचारातून या उपक्रमाला सुरुवात झाली. केवळ १०१ महिलांपासून सुरु झालेल्या उपक्रमात आज ३१ हजार महिला सहभागी झाल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. मनिषा शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

* विविध देशांतील परदेशी पर्यटकांची पठणाकरीता उपस्थिती
पुण्याचा गणेशोत्सव आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगात आहे. त्यामुळे दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासोबतच अथर्वशीर्ष पठणाच्या सोहळ्याला फ्रान्स, इस्त्राईल, इटली, मॅस्कीको, पोलंड, तुर्कीसह विविध देशातील ३० हून अधिक परदेशी पर्यटकांनी पठणाकरीता हजेरी लावली. यावेळी सहभाग घेत पाहुण्यांनी गणपतीचे दर्शन घेण्यासोबतच हा सोहळा आपल्या कॅमे-यामध्ये टिपला.

Leave A Reply

Your email address will not be published.