‘हा’ संघ जिंकणार कसोटी ‘चॅम्पियन’शीप, सेहवागची ‘भविष्य’वाणी !

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विंडीजविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने यजमान विंडीज संघाचा 318 धावांनी दणदणीत पराभव केला. यासह भारतीय संघाने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत विजयी खाते देखील उघडले. 1 ऑगस्टपासून या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपला सुरुवात झाली असून पुढील दोन वर्ष म्हणजेच 2021 पर्यंत हि स्पर्धा चालणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत सर्वात वरच्या स्थानावर राहून अंतिम सामना खेळण्याची प्रत्येक संघाची इच्छा आहे.

या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये नऊ संघाचा समावेश असून यामध्ये इंग्लंड, श्रीलंका, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, बांगलादेश यांचा समावेश आहे. या अजिंक्यपद स्पर्धेत दोन वर्षात एकूण 27 कसोटी मालिका होणार असून यामध्ये 72 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेत सुरुवातीला गुणतालिकेत भारत अव्वल स्थानी असून विंडीजविरुद्ध पहिल्या सामन्यात मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे भारत पहिल्या क्रमांकावर आरूढ आहे. त्याचदरम्यान भारतीय संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग याने या स्पर्धेविषयी भविष्यवाणी केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राशी संवाद साधताना सेहवागने आपले मत व्यक्त केले आहे.

यावेळी बोलताना तो म्हणाला कि, कसोटी चॅम्पियनशिप ही स्पर्धा देखील फार महत्वाची आहे. त्याचबरोबर हि स्पर्धा कोण जिंकू शकतो याची भविष्यवाणी करताना त्याने म्हटले कि, भारतीय संघ सगळ्यात मजबूत वाटत असून तो समतोल देखील आहे. भारतीय संघाकडे चांगले फलंदाज तसेच चांगले गोलंदाज देखील असून भारतीय संघ सुरक्षित हातात असून दोन वर्षांचा कालावधी देखील फार मोठा आहे. त्यामुळे भारतीय संघाकडे सध्या हि स्पर्धा जिंकण्याची उत्तम संधी आहे.

कसोटी चॅम्पियनसाठी असे आहेत निकष –

या चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक संघ होम-अवे अशा प्रत्येकी तीन-तीन कसोटी मालिका खेळणार आहेत. त्यामुळे सर्वांनाच विजयाची आणि उत्तम कामगिरी करण्याची समान संधी उपलब्ध आहे. या स्पर्धेत एका कसोटी सामन्यात विजय मिळवल्यास 60 गुण मिळणार असून सर्वात जास्त गुण असणारे दोन अव्वल संघ या चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भिडणार आहेत.

दरम्यान, सध्या भारत, श्रीलंका आणि न्यूझीलंड एकेका विजयासह अनुक्रमे पहिल्या , दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.