डेटिंग अ‍ॅपवरील ‘मैत्री’ तरुणीला पडली महागात, अश्लिल फोटो व्हायरलची धमकी

girl
31st August 2019

पिंपरी : एन पी न्यूज २४ – डेटिंग अ‍ॅपवर झालेली मैत्री एका तरुणीला भलतीच महागात पडली. पिंपळे सौदागार येथे राहणाऱ्या या तरुणीला जालंदरच्या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तिचा अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून तब्बल ९३ हजार रुपये लुबाडले.

याप्रकरणी पिंपळे सौदागर येथे राहणाऱ्या २९ वर्षाच्या तरुणीने सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी साहिल प्रमोद आरोरा (रा. हुशीयारपूर रोड, जालंदर, पंजाब) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १५ जून २०१९ पासून सुरु होता.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही तरुणी नोकरी करत असून तिची आणि साहिल आरोरा यांची डेटिंग अ‍ॅपवरुन ओळख झाली होती. आरोरा याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिचा विश्वास संपादन करुन त्याने गुगल पेद्वारे तिच्याकडून वेळोवेळी ९३ हजार रुपये घेतले. त्यानंतरही तो पैसे मागू लागला. तेव्हा तिने अधिक पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने या तरुणीच्या ब्रेस्टचा व्हिडिओ स्रॅप शॉट बनवून तो या तरुणीला पाठविला व तो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याच्या या धमक्यांना कंटाळून तिने पोलिसांकडे धाव घेतली. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.