कोहीनूर मिल प्रकरण : राज ठाकरेंना 20 कोटींचा फायदा कसा ? ED समोर ‘यक्ष’ प्रश्न

मुंबई : एन पी न्यूज २४ – गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीने सुमारे साडे आठ तास कसून चौकशी केली. कथित गैरव्यवहार प्रकरणाची तपासणी करताना कोणत्याही गुंतवणुकीशिवाय राज ठाकरे यांना 20 कोटींचा फायदा कसा झाला असा प्रश्न ईडीला पडला आहे.
राज ठाकरेंना 2008 मध्ये 20 कोटींचा फायदा झाला, त्यांनी मातोश्री रियल्टर्समध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. मातोश्री रियल्टर्स कंपनी स्थापन केल्यानंतर सहकारी बँकेकडून तीन कोटींचे कर्ज घेतलं होतं. याशिवाय कंपनीला अतिरिक्त एक कोटी रुपयांची आर्थिक मदतही मिळाली होती. ही मदतसुद्धा कशी मिळाली असा प्रश्न ईडीला पडला आहे.
राज ठाकरेंनी केलेले सर्व व्यवहार तपासले जात आहेत. त्याचप्रमाणे व्यवहाराशी निगडित असणाऱ्या सर्व कागदपत्रांची चौकशी केली जात आहे, त्यात काही शंकास्पद वाटल्यास राज ठाकरेंना पुन्हा चौकशीला बोलावले जाणार आहे.
कोहिनूर सीटीएनएल कंपनीतून भागीदारांनी काढता पाय घेतल्यामुळे कंपनीला 135 कोटींचे नुकसान झाले होते. राज ठाकरेंनी मातोश्री रियल्टर्समधील भागिदारी 80 कोटी रुपयांमध्ये विकली. जमीनींचे दर वाढल्यानं आम्हाला फायदा झाला असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं. मात्र राज ठाकरेंच्या कंपनीने केलेली गुंतवणूक संशयाच्या भोऱ्यात अडकली आहे. कंपनीत गुंतवणूक करण्यात आलेली रक्कम आणि त्यासाठी घेतलेले बँकांचे कर्ज यामध्ये ईडीला संशय असून याबाबतचा तपास ईडीने सुरु केला आहे.